“विचारविमर्श अधिक अंतर्दृष्टी देते आणि अनुमानांचे निश्चितीत परिवर्तन करते. तो एक चमकणारा प्रकाश आहे, जो अंधकारमय जगात दिशा दाखवतो व मार्गदर्शन करतो. प्रत्येक बाबतीत परिपूर्णता आणि परिपक्वता यांना स्थान प्राप्त होते आणि पुढेही राहील. समजण्याच्या देणगीची परिपक्वता परामर्शांद्वारे प्रकट केली जाते.”


बहाउल्लाह

बहाई धर्मात धर्मोपदेशक नसतात. गुप्त मतदान पध्दतीने स्थानिक, क्षेत्रीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था निवडल्या जातात आणि त्या सर्व कामकाजाचे व्यवस्थापन करतात. या निवडणुका कोणत्याही प्रचाराशिवाय होतात. या संस्थांवर निवडून येणाऱ्या श्रध्दावंतांना कोणतेही वैयक्तिक अधिकार नसतात, पण ते ज्या संस्थेचे सभासद असतात त्या संस्थांकडे कायदे बनविण्याचे, ते राबविण्याचे व न्यायदानाचे अधिकार असतात. या संस्थां बहाई समुदायाची अंतर्गत व्यवस्था पाहतात, तसेच त्यांना आध्यात्मिक व भौतिक सुविधा पुरवतात.

बहाई प्रशासन व्यवस्थेचा एक भाग असलेल्या या संस्थां विचारविमर्शाच्या तत्वावर काम करतात. या तत्वानुसार, या संस्थांचे सभासद चर्चा करून प्रत्येक गोष्टीमधील सत्याचा शोध घेतात. ते स्पष्टपणे आपले मत मांडतात, पण स्वतःच्या दृष्टिकोनाला चिकटून न बसता इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना वास्तवाचा विशाल दृष्टिकोन प्राप्त होऊ शकतो. अशाप्रकारे, घोटाळे, पक्षपात आणि स्वतःच्या फायद्यासाठी दबाव टाकण्याच्या इतर प्रकारांना आळा बसतो.