“तुम्ही ज्या युगात जगत आहात त्या युगाच्या आवश्यकतांसंबंधी उत्सुकतेने निगडित रहा आणि त्याच्या अपेक्षा व गरजांवर आपले विचार केंद्रित करा.”



बहाउल्लाह

मानवजात प्रौढावस्थेकडे वाटचाल करत असतांना, मानवजातेपुढील मूलभूत प्रश्नांची संकल्पना, दृष्टिकोन आणि विचार यात परिवर्तन होणे समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. वैचारिक पातळीवर या परिवर्तनाच्या प्रक्रियेला हातभार लावणे महत्वाचे आहे आणि जगभरातील बहाई समुदाय ते शिकत आहे. स्त्रीपुरुष समानता, शांती, प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, विकास अशा मानवतेच्या कल्याणाशी निगडीत विषयांवरील चर्चेत सहभागी व्हायला बहाई समुदाय तयार होत आहे.

एखाद्या विषयावरील बहाईंचे विचार इतरांनी मान्य करावे म्हणून प्रयत्न करणे हा अशा चर्चेत सहभागी होण्यामागे उद्देश नसतो. जनसंपर्क किंवा शैक्षणिक अभ्यास यासाठीही हे प्रयत्न नसतात. किंबहुना, अभ्यासू वृत्तीने खरा संवाद साधण्यासाठी बहाई धडपड करतात. तसे पाहता, हवामान बदल, स्त्रियांचे आरोग्य, अन्नधान्य निर्मिती किंवा दारिद्र्य निर्मूलन अशा मानवाला भेडसाविणाऱ्या प्रश्नांवर विशिष्ट उपाय सांगण्याचा आव ते आणत नाहीत. तरीपण, जगातल्या भिन्न परिस्थितीत मानवी संस्कृतीची प्रगती करण्यासाठी बहाउल्लाह यांची शिकवण वापरतांना बहाईंना जो अनुभव मिळतो तो इतरांना सांगण्यास आणि समविचारी गटांशी तसेच व्यक्तींशी विचारांची देवाणघेवाण करण्यास ते उत्सुक असतात.

भारतातील बहाई समाजाचा इतिहास पहाता स्त्रीपुरुष समानता, सामाजिक आणि आर्थिक प्रगती, धर्मांचे समाजातील स्थान, बालकांचे हक्क, तरुणांचे व समाजाचे परिवर्तन अशा विषयांवरील चर्चांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतलेला दिसतो.