“परमेश्वराच्या पवित्र आदेशांनुसार जगातील सर्व लोकांमध्ये एकात्मता व सुसंवाद निर्माण करणे हे धर्माचे उद्दिष्ट आहे; त्याला संघर्षाचे किंवा वितुष्टता निर्माण करण्याचे कारण होऊ देऊ नका.”


बहाउल्लाह

बहाई धर्माच्या स्थापनेपासूनच बहाईंच्या इतिहासाशी भारतीय उपखंड निगडीत आहे. या उपखंडातील सैय्यद-ए-हिंदी हा महात्मा बाब (अवतार बहाउल्लाह यांचे अग्रदूत) यांच्या सर्वांत प्रथम झालेल्या अनुयायांपैकी एक होता. त्यांच्याप्रमाणेच भारतातील अनेक जणांनी महात्मा बाब यांचे पवित्र स्थान त्यांच्या अल्प आयुष्यातच जाणले होते. महात्मा बाब यांच्या अवतार कार्यादरम्यान, परमेश्वराच्या शिकवणींचा प्रकाश भारतातील मुंबई, हैद्राबाद, जौनपूर, रामपूर आणि पालनपूर अशा शहरांत व गावांत पोहोचला होता.

जमाल एफेंदी या सन्माननीय पर्शियन सद्गृहस्थाने भारतीय उपखंडात प्रवास करतांना सन १८७२ मध्ये बहाउल्लाह यांच्या शिकवणी भारतात आणल्या. त्यांनी उत्तरेच्या रामपूर, लखनौपासून पूर्वेस कलकत्ता, रंगून; पश्चिमेस बडोदा, मुंबई आणि शेवटी दक्षिणेस चेन्नाई, कोलंबो असा भारतभर प्रवास केला. नवाब, राजे महाराजे, ब्रिटिश अधिकारी यांच्यापासून सामान्य लोकांपर्यंत सर्वांना त्यांनी बहाउल्लाह यांच्या एकात्मता व बंधुत्वाच्या शिकवणींचा परिचय करून दिला. त्यावेळच्या सामाजिक बंधनांना झुगारून, जाति व्यवस्था आणि धार्मिक समजुतींना छेद देत ते सर्व जातींच्या, सर्व परिस्थितीतील लोकांमध्ये मिसळले.

एकोणिसावे शतक संपतांना मुंबई, दिल्ली, पुणे आणि हैद्राबाद येथे छोटा बहाई समुदाय निर्माण झाला होता. सातत्याने वाढणाऱ्या बहाई समुदायाच्या कामकाजाची व्यवस्था ठेवण्यासाठी सन १९२३ मध्ये या उपखंडातील बहाईंनी पहिली राष्ट्रीय आध्यात्मिक सभा निवडून दिली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकात भारतातील बहाई समाज बराच वाढला आणि बहाई शिकवण त्या काळच्या नेत्यांचे व विचारवंतांचे लक्ष वेधून घेऊ लागली. अनेक बहाईंशी संवाद साधल्यानंतर महात्मा गांधींनी जाहीर केले की, “बहाई धर्म हे मानवजातीचे सांत्वन आहे.” त्याचप्रमाणे अनेक बहाई विचारवंतांना भेटल्यावर रविंद्रनाथ टागोर म्हणाले की, “बहाउल्लाह हे आशिया खंडात अवतरलेले सर्वात आधुनिक देवदूत आहेत आणि मानवी संस्कृतीच्या प्रगतीसाठी त्यांचा संदेश अतिशय महत्वाचा आहे.”

साधारण १९६०-७० च्या काळात बहाउल्लाह यांचा संदेश भारतात, विशेषतः खेड्यापाड्यात, मोठ्या प्रमाणात पोहोचू लागला. लोक जेंव्हा बहाई शिकवण ऐकत तेंव्हा त्यांचे मोल जाणून कित्येकदा उत्स्फूर्त प्रतिसाद देत. हजारो लाखो भारतीयांना त्यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उराशी बाळगलेल्या स्वप्नाची पूर्ती या शिकवणीत दिसे. आधुनिक काळातील समाजाच्या गरजांशी सुसंवाद साधेल अशा प्रकारे ही मूल्ये आचरणात आणायला त्यांना नवी प्रेरणा मिळाली.

आपल्या समाजातील आव्हानांना तोंड देण्यासाठी या विचारांचा वापर करायला हजारो लोक धडपडू लागले. भारतभरातील बहाई समुदायाने लोकशाही पध्दतीने निवडलेल्या शेकडो स्थानिक आध्यात्मिक सभा कार्यरत केल्या ज्या स्थानिक गरजांनुसार सेवाभावी कार्य करू लागल्या. मुलांसाठी नैतिक मूल्यांचे शिक्षण ही आवश्यक बाब ठरली आणि देशभरात खेडोपाडी अशा शिक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले. सन १९८० पर्यंत बहाई विचारांनी प्रेरित झालेले शेकडो ग्रामीण प्रशिक्षण वर्ग, तसेच अनेक मोठ्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या. तसेच व्यवसाय व शिक्षक प्रशिक्षण, कृषिउद्योग, साक्षरता, पर्यावरणाविषयी जागरुकता, नारीशक्तीकरण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात प्रकल्प सुरू झाले.

नवी दिल्ली येथे बहाई उपासना मंदीर बांधण्यात आले, तेंव्हा मानवी मनात आणि समाजात जे परिवर्तन बहाउल्लाह यांना अपेक्षित होते, त्याचे प्रतीक म्हणून हे मंदीर साऱ्या जगात मान्यता पावले. त्याचा कमळासारखा आकार जणु आपल्याला विश्वास देतो की अतिशय भयानक परिस्थितीच्या दलदलीतूनही नवे सुंदर जग उमलू शकते. ते एकात्मतेचेही प्रतीक आहे. सन १९८६ मध्ये त्याचे उदघाटन झाल्यापासून दररोज वेगवेगळ्या जातीधर्माचे, वेगवेगळ्या देशातील सुमारे दहा हजार लोक त्याच्या घुमटाखाली जमतात आणि त्या जगन्नियंत्याची मूकपणे प्रार्थना करतात.

भारतातला बहाई समुदाय संख्येने व समर्थतेने जसजसा वाढत गेला, तसतसा तो समुदाय जीवनात जास्त महत्वाची भूमिका बजावू लागला. राष्ट्रीय स्तरावर जातीय सलोखा, स्त्रीपुरुष समानता, शिक्षण, समता, सुशासन आणि विकास या क्षेत्रातील बहाईंचे विचार प्रभावशाली ठरू लागले.

आज भारतात वीस लाखाहून अधिक बहाई अनुयायी आहेत. त्यांनी स्वतःला देशसेवेला वाहून घेतले आहे आणि समाज घडविण्याच्या कार्यात ते इतरांबरोबर सहभागी आहेत--असा समाज जिथे एकता आणि न्याय नांदतो, जिथे पूर्वग्रहांना थारा नाही, जिथे स्त्री व पुरुष खांद्याला खांदा लावून बरोबरीने समाज सेवा करतात, जिथे मुलांना व तरुणांना सर्वोत्तम शास्त्रीय व आध्यात्मिक शिक्षण मिळते आणि जिथे समाजाचे भक्तिपूर्ण जीवन त्यांचे समाज विघातक शक्तींपासून रक्षण करते.

Scroll Up