“मी इतरांसारखाच सामान्य माणूस होतो, माझ्या शयनावर निद्रेत होतो, आणि अचानक, सर्व वैभवशाली परमेश्वराची वायुलहरी माझ्या अंगावरून तरंगत गेली आणि मला सर्व काही दैवी ज्ञान प्राप्त झाले. हे सर्व ज्ञान माझ्या स्वतःचे नाही, तर सर्वसमर्थ, सर्वज्ञानी अशा त्या परमेश्वराचे आहे. ...मला परमेश्वराची टाळता न येणारी आज्ञा आली ज्यामुळे मला त्याची स्तुती सर्व लोकांना सांगण्यास उद्युक्त केले गेले.”


बहाउल्लाह

एकोणिसाव्या शतकाचा मध्यकाल हा मानवी जीवन नव्याने जागृत होण्याचा काळ होता. यूरोप, लॅटीन अमेरिका, चीन, भारत आणि उत्तर अमेरिका येथे एकापाठोपाठ एक राजकीय आणि सामाजिक दबावाविरुद्ध लोक उद्रेक झाले. असं वाटत होतं की मानवी चेतना, निष्क्रियता आणि अधीनतेच्या एका दीर्घ रात्रीतून जागृत होत होती.

न्याय, समता आणि मानवी सभ्यता यावर आधारित समाजासाठी नवीन दृष्टीकोनाची सर्वांना ओढ लागली होती. नव्या युगाच्या पहाटेची ही जाणीव त्या काळच्या कवींनी शब्दबध्द केली. महान कवी रवींद्रनाथ टागोर लिहितात : “आजच्या युगातील प्रत्येक व्यक्तीला ही साद आलेली आहे की नव्या युगाच्या पहाटेचे स्वागत करण्यासाठी त्याने स्वतःला आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराला सज्ज करावे, जेव्हा सर्व मानवजातीच्या आध्यात्मिक एकत्वात मानवाला त्याचा आत्मा सापडेल.”

अशा वेळी इराणमध्ये, बहुतेक जगाला अज्ञात, ‘बहाउल्लाह’, ईश्वराकडून आलेल्या नवीन संदेशाचा सूर्य आणि या युगासाठी मानवतेच्या परमेश्वरी संदेशवाहकाच्या स्वरुपात उदयास आले. बहाउल्लाह यांनी शिकवले की, ईश्वर एकच आहे, सर्व धर्मांचा उगम त्याच ईश्वरातून झाला आहे, तेच सत्य त्यांचे सार आहे आणि आता सर्व मानवजातीचे एकीकरण करण्याची वेळ आली आहे.

सर्व महान धर्मांच्या संस्थापकांप्रमाणे, बहाउल्लाह यांच्या जीवनातही समान उत्कृष्ट दैवी गुण आढळतात. त्यांचा जन्म १८१७ साली इराणमधील एका सधन आणि कुलवान घरात झाला. लहानपणापासूनच त्यांचे असामान्य शहाणपण जाणवत होते; त्यांचे औदार्य, दयाळूपणा, न्यायबुद्धी हे गुण स्पष्ट दिसत होते. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना राजदरबारी मानाचे स्थान देऊ केले होते, परंतु त्यांनी ते नम्रपणे नाकारले आणि त्याऐवजी पीडित, आजारी आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी आपला वेळ समर्पित केला.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यभागी, एका नव्या धर्माचे प्रेषित संस्थापक म्हणून बहाउल्लाह यांनी त्यांचे ध्येय घोषित केले, तेव्हा त्यांच्या शिकवणीं त्यातल्या आधुनिक दृष्टिकोनामुळे क्रांतिकारी ठरल्या. ‘मानवजातीचे एकीकरण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे’ हे त्यांचे मूलभूत तत्व अनेक सामाजिक शिकवणींनी पूरक होते उदा. स्त्री-पुरुष समानता, विज्ञान आणि धर्मातील सुसंवाद, स्वतंत्रपणे सत्याचा शोध घेण्याची आवश्यकता, पुरोहित पदांचे निर्मूलन, सर्व पूर्वग्रहांचे उच्चाटन आणि सर्वांसाठी सार्वत्रिक शिक्षण.

मध्ययुगीन काळात रुजलेल्या रूढींमुळे धार्मिक आणि राजकारणी परंपरावाद्यांनी बहाउल्लाह यांच्या आधुनिक शिकवणींवर विरोधाचे वादळ उठवले. इराणचे शिया धर्मगुरू तसेच इराणचा राजा आणि ऑटोमन सम्राट यांनी ‘’त्यांचा’ प्रभाव नष्ट करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. बहाउल्लाह यांची सर्व संपत्ती जप्त केली गेली, त्यांचा छळ केला गेला तसेच मारझोड केली, त्यांना जड साखळ्या अडकवून तुरुंगात ठेवले, त्यांना या देशातून त्या देशात चार वेळा हद्दपार केले गेले. अखेर १८९२ साली ऑटोमन राज्याच्या एकर ( आजचे इस्रायलमधील आक्का) येथील गुन्हेगार वसाहतीत त्यांचे निधन झाले.

असा अनन्वित छळ सोसूनही बहाउल्लाह त्यांच्या जीवनकार्यापासून विचलित झाले नाहीत. मानवजातीला मार्गदर्शन करणारे शंभरहून अधिक पवित्र ग्रंथ त्यांनी प्रकट केले. मानवजात सुसंस्कृत सभ्यतेची उच्चतम पातळी गाठेल असा त्यांचा दृढ विश्वास होता आणि त्यासाठी आवश्यक परिवर्तनाची बीजे पेरताना कितीही यातना, त्याग, कष्ट सहन करण्यास ते तयार होते. त्यांच्या जीवनकाळात, शत्रूंचा सतत विरोध असूनही त्यांचा प्रभाव वाढतच गेला. जिथेजिथे त्यांना हद्दपार केले तिथेतिथे त्यांचे तेजस्वी रूप, त्यांचे प्रेम आणि शक्ती यामुळे हजारो लोक त्यांच्या शिकवणीकडे आकृष्ट झाले. आज त्यांचा धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. त्यांचे साठ लाखाहून अधिक अनुयायी आहेत आणि आणखी लाखो लोक जग एकात्म घडवण्याची प्रेरणा त्यांच्या विचारांतून घेत आहेत.

केम्ब्रिजमधील पौर्वात्य संस्कृतीचे अभ्यासक एडवर्ड ग्रॅनविल ब्राऊन बहाउल्लाह यांना त्यांच्या निधनापूर्वी भेटले होते. त्यांनी भावी पिढीसाठी बहाउल्लाह यांचे हे जणू चलतचित्र शब्दबध्द केले आहे: “मला वर्णन करता येणार नाही, पण त्यांचा तो चेहरा मी बघतच राहिलो आणि कधीच विसरू शकणार नाही. ती भेदक नजर जणू माझे मन वाचत होती, त्या दाट भुवयांतून अधिकार आणि ताकद स्पष्ट जाणवत होती ...मी कुणासमोर उभा होतो हे विचारावेच लागले नाही, कारण राजेमहाराजेही हेवा करतील अशा त्या भक्ती आणि प्रेमाच्या प्रतीकासमोर मी आपोआप नतमस्तक झालो होतो.”

Exploring this topic:

The Life of Bahá’u’lláh

The Early Bahá’í Community

The Shrine of Bahá’u’lláh

Quotations

Articles and Resources