“संस्कृती उघड झाली आहे. राष्ट्रांची प्रगती झाली आहे. …विज्ञान, नवीन सत्ये आणि शोध वाढले आहेत. या सर्व गोष्टी दर्शवितात की अस्तित्वातील जग सतत प्रगती करत आहे आणि विकसित होत आहे; आणि म्हणूनच, नक्कीच मनुष्याची परिपक्वता दर्शविणारे गुण, त्याच प्रमाणात, विस्तृत झाले पाहिजेत आणि वाढले पाहिजेत.”अब्दुल-बहा

आज मानवजात एका संक्रमण युगात आहे, जेथे बाल्यावस्थेची अपरिपक्वता मागे ठेवून ती परिपक्वतेच्या उंबरठ्याप्रत पोहोचत आहे. इतर जगाप्रमाणेच, भारतातील समाज भयभीत करणाऱ्या बदलांतून जात आहे, जेथे पूर्वीच्या काळातील प्रणाली, रचना आणि परंपरा यापुढे सद्यकालीन जगाच्या जटिल वास्तवतांना संबोधित करू शकत नाहीत. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर नैतिक पुनरुत्थान होण्यासाठी सर्वत्र आर्जवी आवाहन केले जात आहे, जेणेकरून या संक्रमण प्रक्रियेला मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळू शकेल.

ऐतिहासिकदृष्ट्या, मानवी रीतींना सभ्यता देणारी धर्म हीच प्राथमिक शक्ती आहे आणि नैतिकता व कायदे याबाबतच्या त्याच्या योगदानाने समाजाची घडी संरक्षित ठेवली आहे. कृष्ण, बुध्द, झरतुष्ट्र, मोझेस, येशू ख्रिस्त आणि मुहंमद अशा दैवी अवतारांनी त्या त्या युगाच्या गरजांना अनुसरून आध्यात्मिक व नैतिक शिकवणी प्रकट करून संस्कृतीची प्रगती साधली.

दैवी प्रकटीकरणाच्या अनंत प्रक्रियेत बहाई धर्मश्रध्दा हा नवीनतम अध्याय आहे. बहाई धर्मश्रध्देचे संस्थापक अवतार बहाउल्लाह यांनी प्रकट केले की मानवजात आता त्याच्या सामूहिक उत्क्रांतीच्या वळणावर आहे जेथे मानवजातीचे ऐक्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आणि क्षमता तिला प्राप्त आहे. हे एकीकरण, मानवतेच्या ‘वयात येण्याचे’ चिन्ह आहे; यात व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन आणि समाजाची संरचना यांचे संपूर्ण पुनरुत्थान होईल.

मानवजातीच्या एकतेच्या ध्येयाकडे जाण्याच्या प्रगतीपथावर संक्रमणाच्या या युगात, बहाई धर्मश्रध्देचा उद्देश व्यक्तीच्या आणि समाजाच्या संरचनांच्या अंतर्गत जीवनातील शाश्वत परिवर्तनांचे उत्तेजन, पोषण आणि मार्गदर्शन करणे होय.

Scroll Up