“जे विहित आहे ते प्रत्यक्ष अस्तित्वात व कृतीत उतरविणे, हे अंतर्दृष्टी व जाणीव असणाऱ्या प्रत्येक मानवास आवश्यक आहे.... तो आहे खरा मानव जो आज अखिल मानवजातीच्या सेवेसाठी स्वतःस वाहून घेतो.”बहाउल्लाह

एखाद्या समुदायात किंवा गावात समाज बांधणीची प्रक्रिया जेंव्हा वेग घेते, तेंव्हा त्यात सहभागी झालेले मित्र लोकांच्या सामाजिक व भौतिक प्रश्नांकडे अधिकाधिक खेचले जातात. बहाई धर्मश्रध्देच्या आध्यात्मिक शिकवणीतून त्यांना जी तत्वे समजतात ती त्यांच्या समोरील प्रश्न सोडवायला ते वापरू लागतात, उदा. स्त्रीपुरुष समानता, पर्यावरण, आरोग्य, कृषिउद्योग आणि शिक्षण यांचा प्रसार करणे. एकदा अशा प्रश्नांची जाणीव निर्माण झाली की अध्ययन वर्ग, किशोर-युवा गट, सामूहिक प्रार्थना यातील सहभागातून नवी दृष्टी प्राप्त झालेले मित्रांचे गट त्यांच्या समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करू लागतात. अनौपचारिक प्रयत्न आणि प्रकल्प कधीकधी प्रशिक्षण वर्ग, समाज शाळा अशा कायमस्वरूपी प्रकल्पात परिवर्तित होतात. काहींना कालांतराने एखाद्या बहुविध विकास संस्थेचे किंवा मोठ्या शिक्षण संस्थेचे स्वरूप प्राप्त होते.

या साऱ्या प्रयत्नांचे क्षेत्र आणि त्यांची व्याप्ती भिन्न असली तरी काही गोष्टी या सर्व समाजकार्यात अंतर्भूत आहेत, त्या अशा: मानवतेची आध्यात्मिक व भौतिक प्रगती करण्यास सहाय्य करण्याची दृष्टी, मानवजातीची एकता व न्यायाच्या तत्वावर ठाम विश्वास, आपल्या समुदायाची उन्नती करण्यासाठी काय काय करता येईल याचे सर्वांना ज्ञान देऊन त्यांची समाजकार्याची क्षमता वाढविण्यावर भर आणि विचारविमर्श-अभ्यास-कृती-समीक्षा अशा क्रमाने कृतीतून शिकण्याचा दृष्टिकोन!

Scroll Up