“किशोर वयाचा काळ हा शक्ती आणि जोम यामुळे वैशिष्ठ्यपूर्ण असतो आणि मानवी जीवनात सर्वात चांगला असा निवडक काळ असतो. म्हणून तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून स्वर्गीय सामर्थ्याने संपन्न, अप्रतिम हेतूंनी प्रेरित आणि परमेश्वराच्या दैवी सामर्थ्याच्या व स्वर्गीय कृपेच्या व मान्यतेच्या सहाय्याने.........”



अब्दुल-बहा

बहाई समुदाय मानतो की मनुष्याच्या जीवनातील किशोरवय कालावधी हा वसंतऋतु प्रमाणे विशेष काळ असतो. जर किशोरांच्या आयुष्याच्या या टप्प्यात सतत वाढत असलेल्या बौध्दिक, आध्यात्मिक व शारिरिक क्षमता सामाजिक परिवर्तनाकडे वळविल्या तर समाज आणि किशोर या दोघांनाही त्यांची क्षमता कळू शकेल. कुमारवयात एका विशिष्ट प्रकारच्या तयारीची गरज असते, असा वेळ ज्यावेळी ११ ते १४ या वयाच्या मुलांमध्ये वेगाने बदल होत असतात, जेव्हा ते बालपण मागे सोडून परिपक्वतेकडे प्रवास करत असतात. या किशोरवयीन मुलांना अनेक नवेनवे प्रश्न पडतात आणि या वयात नव्या आकांक्षा निर्माण होतात. हा वयोगट बऱ्याचवेळा समस्याजनक गणला जातो आणि त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर असतो परंतु किशोरवयीन उपक्रम अशा विश्वासावर आधारलेला आहे की या मुलांमध्ये लोककार्याची क्षमता, विश्व जाणून घेण्याची उत्सुकता, न्यायाचा आग्रह आणि जगाच्या कल्याणासाठी कार्य करण्याचा उत्साह हे गुण आढळतात. या गटाला आव्हाने आणि शक्यता यांनी भरलेल्या कालखंडातून प्रवास करतांना मदत करण्यासाठी बहाई समुदायाने जागतिक स्तरावर किशोरवयीन मुलांची आध्यात्मिक शक्ति वाढवणारा उपक्रम आखला आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून १५ वर्षावरील युवकांना अनुप्रेरक म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते, ज्यायोगे त्यांच्या परिसरातील किशोरांच्या छोट्या गटांत ते सहभागी होऊ शकतील. आपल्या अनुप्रेरकांच्या मदतीने हे किशोर त्यांच्या मनात खोल दडलेल्या प्रश्नांचा शोध घेऊ शकतात. आध्यात्मिक दृष्टिकोन वाढवणारे साहित्य आणि निर्णय घेण्यासाठी नैतिक चौकट यांचा ते अभ्यास करतात. त्यांची अभिव्यक्तीची क्षमता चांगल्याप्रकारे वाढवण्यासाठी या साहित्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे त्यांची अमाप शक्ति समाजसेवेकडे वळवली जाते. या उपक्रमातून त्यांना वास्तवतेचे दर्शन घडते आणि समाजातील विधायक व विध्वंसक शक्तींचे विश्लेषण करण्यास सहाय़्य होते. त्यांचे खरे उदात्त असे व्यक्तिमत्व हिरावून नेणाऱ्या शक्तींशी सामना करण्यास त्यांना त्याने मदत होते आणि योग्य प्रकारचे बदल घडवण्याच्या प्रयत्नांशी ते सामायिक होतात. आपल्या मोकळ्या वेळेत अनुप्रेरक म्हणून काम करण्यास तयार असलेल्या हजारो युवकांच्या सहाय्याने सध्या भारतातील अनेक दशसहस्र किशोर अशा गटांमध्ये सहभागी आहेत.