भारतातील खेडी आणि वस्त्या उत्साहाने सामुहिक प्रार्थनेसाठी जात आहेत. भिन्न स्थितीतील हजारो लोक मासिक, साप्ताहिक किंवा दैनिक तत्वावर भेटतात आणि सामूहिक प्रार्थना म्हणतात, पवित्र ग्रंथातील उतारे वाचतात आणि ते आचरणात आणण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करतात. भिन्न वयोगटातील, भिन्न परिस्थितीतील मित्रांच्या या छोट्या मेळाव्यांमुळे त्यांचे आध्यात्मिक जीवन समृध्द होते, तसेच त्या भागातील समाजाच्या एकात्मतेचे आध्यात्मिक ऋणानुबंध भक्कम होतात.
सर्व पार्श्वभूमीतील लोक जिथे प्रार्थना व उपासनेसाठी जमू शकतात अशी बहाई प्रार्थना मंदिरे आहेतच (याचे ठळक उदाहरण म्हणजे दिल्लीतले कमळ मंदीर, बहाई उपासना गृह), पण त्याशिवाय बहाईंची अशी श्रध्दा आहे की जिथे लोक ईश्वर स्मरणासाठी जमतात असे कोणतेही स्थान एखाद्या मंदिराप्रमाणेच आशिर्वादित असते. बहाई धर्मात पुजारी वर्ग नाहीत, त्यामुळे आपल्या समाजाची आध्यात्मिक पातळी उंचावण्यात पुढाकार घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी ठरते, आणि प्रार्थना सभा आयोजित करून बहाई अनुयायी आणि त्यांची कुटुंबे एका प्रकारे ही जबाबदारी पार पाडत आहेत.