कालप्रवाहाबरोबर अधिकाधिक लोकांना बहाउल्लाह यांच्या शिकवणीतून हे आकलन होऊ लागले आहे की त्यांचे सुंदर जगाचे स्वप्न आणि गहन अंतर्दृष्टी त्यांनी ठोस तत्वांमध्ये परिवर्तित केली आहे, ज्यामुळे ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मार्गदर्शन होऊ शकेल. काहीजण पुढे जाऊन बहाई श्रध्देचा एक धर्म म्हणून शोध घेतात. असे करत असतांना, ते मनुष्य स्वभावाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण, ईश्वरी मार्गदर्शनाचे वर्णन, या जगातील जीवनाचा हेतु आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचे स्वरूप यावरील वचने, वैयक्तिक व सामूहिक उपासनेसंबंधीची आज्ञावचने, या साऱ्याचा ते अभ्यास करतात. आणि अर्थातच बहाई पवित्र ग्रंथ आणि कायदे, त्यांचे प्रशासन चालविणारी तत्वे व नियम याचा त्यांना परिचय होतो. ही आणि अशीच तत्वे मान्य झाल्यावर त्यांना सळसळत्या बहाई समाज जीवनात सहभागी होण्यासाठी मार्ग मोकळा होतो–असे समाज जीवन जे बहाउल्लाह यांची शिकवण वास्तवात आणण्याच्या कामाला वाहिलेले आहे. आपल्या धार्मिक श्रध्दा इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी बहाई साहजिकच उत्सुक असतात आणि एखाद्याच्या हृदयात या श्रध्देची ठिणगी पडली तर त्याचे बहाई समुदायात कृतिशील घटक म्हणून स्वागत होते; समाजाच्या सतत होणाऱ्या वाढीत व आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्याला आमंत्रित केले जाते. मात्र ‘धर्मांतर’ ही सामान्य संकल्पना इथे लागू होत नाही आणि धर्म बदलण्यासाठी प्रभाव टाकणे हे निषिध्द मानले जाते.
या पार्श्वभूमीवर, जेंव्हा एखादा बहाई त्याच्या श्रध्दा दुसऱ्यापर्यंत पोचवतो तेंव्हा ती कृती म्हणजे एखादा मुद्दा पटविण्याचा किंवा सिध्द करण्याचा प्रयत्न नसतो. आपल्या अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नावर अर्थपूर्ण संवाद साधणे, सत्याचा शोध घेत गैरसमजुती दूर करणे अशी प्रामाणिक इच्छा तो व्यक्त करत असतो. बहाउल्लाह यांनी म्हटले आहे की, “If ye be aware of a certain truth”, “तुम्हास विशिष्ट सत्याची प्रचीती आली असेल, एखाद्या रत्नाची प्राप्ती झाली असेल आणि त्याच्यापासून इतर वंचित असतील तर अत्यंत सदयतेच्या आणि सदिच्छेच्या भाषेने त्यांनाही त्यासाठी सहभागी करा. ते स्वीकारले गेले, त्याचा हेतू पूर्ण झाला तर तुमचे ध्येय तुम्हास साध्य झाले. कोणी त्यास नाकारले तर त्यास त्याच्या स्वाधीन करा आणि परमेश्वराची त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करा.”
नव्या जगाच्या उभारणीसाठी श्रध्दा आणि मूल्ये केवळ व्यक्त करणे पुरेसे नाही, एकाग्रतेने केलेली कृतीही आवश्यक आहे. बहाउल्लाह लिहितात की, “जे विहित आहे ते प्रत्यक्ष अस्तित्वात व कृतीत उतरविणे, हे अंतर्दृष्टी व जाणीव असणाऱ्या प्रत्येक मानवास आवश्यक आहे.”